Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लसीकरणाच्या नियमावलीमध्ये केंद्राकडून बदल

नवी  दिल्ली वृत्तसंस्था  । तज्ञ गटाच्या राष्ट्रीय समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवत कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस देण्याच्या  प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

देशात कोरोनाचा कहर सुरुच असून रोज लाखोंच्या संख्येनं लोकांना कोरोनाची लागण होत आहे. लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर किती महिन्यांनी लस घ्यावी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्यास दुसऱ्या डोस कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. स्तनपान करण्याऱ्या सर्व महिलांना कोरोनाची लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनामुक्त व्यक्तीला अँटीबॉडी किंवा प्लाझा दिले गेले असतील तरी . त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या तीन महिन्यानंतर कोरोनाची लस घेण्यास सांगितलं आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना ४ ते ८ आठवडे प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे.

 

Exit mobile version