Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चांद्रयान-३ प्रकल्प संचालकपदी पी. वीरामुथुवेल यांची नियुक्ती

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताच्या चांद्रयान-२ प्रकल्पाच्या संचालिका एम.वनिता यांना चांद्रयान-३ प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. वनिता यांच्या जागी आता पी.वीरामुथुवेल यांची प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रितू कारिधाल यांना चांद्रयान-३ मोहिमेच्या संचालकपदी कायम ठेवण्यात आले आहे. चांद्रयान-२ मोहिमेतही त्यांच्याकडे संचालकपदाची जबाबदारी होती. वनिता यांच्या टीमकडे चांद्रयान-२ मिशनमधील सर्व सिस्टिम्सची जबाबदारी होती. याच सिस्टिमचा भाग असलेल्या विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरले होते. वनिता यांच्या बदलीमागे नेमके काय कारण आहे, ते इस्रोने अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. चांद्रयान-२ मोहिमेच्या संचालकपदी रितू कारिधाल आणि प्रकल्प संचालकपदी वनिता यांची नियुक्ती केल्यानंतर इस्रोचे मोठया प्रमाणात कौतुक करण्यात आले होते. इस्रोच्या २८ नोव्हेंबरच्या पत्रकामध्ये एम.वनिता यांच्या बदलीची माहिती देण्यात आली आहे. एम.वनिता या उत्तम शास्त्रज्ञ असून त्या सध्या चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रकल्प संचालिका आहेत. त्यांची आता पीडीएमएसएच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात येत आहे. इस्रोच्या मुख्यालयात कार्यरत असणारे पी. वीरामुथुवेल यांची चांद्रयान-३ च्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version