Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र !

मुंबई । सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, पाटील यांनी आज रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. 

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधण्यात आला होता. त्यावरुन, चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. त्यानुसार, पाटील यांनी आज रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं असून ते सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही करण्यात आलंय. 

मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावानं लागतो,” असं पाटील म्हणाले होते. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती भाषा रश्मी ठाकरे या संपादक असलेलं संपादकीय असूच शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. आता, पाटील यांनी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात पाटील यांनी शेवटच्या ओळीत रश्मी ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या आहेत. 

रश्मी ठाकरे यांना व्यक्ती म्हणून मी चांगला ओळखतो व मला खात्री आहे की, त्यांनाही ही भाषा आवडत नसेल. संपादक या नात्याने त्या या गोष्टींचा नक्की विचार करतील. तसेच, माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ! असं पाटील यांनी रश्मी ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. 

त्याचबाबत बोलताना त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. “आमच्यावर काय टीका केली आहे हे पाहण्यासाठी आम्ही सामना नेहमीच वाचतो. मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार हे समजल्यावर त्याला तक्रारीचं रूप संजय राऊतांनी दिलं आणि माझ्यावर पुन्हा नव्याने टीका केली. राऊत आता मला घाबरतायत असं ते म्हणाले. यातून हेच स्पष्ट दिसून येतं की ते बहुदा रश्मी ठाकरे यांना फारसे घाबरत नाहीत. त्यांच्या अशा वक्तव्यानंतर, ‘कोण रश्मी वहिनी (ठाकरे)?’ असं बहुतेक संजय राऊतांचं म्हणणं असावं असं दिसतंय”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

 

 

 

 

 

Exit mobile version