Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले : चंद्रकांत पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्र्यांच्या बीकेसीमधील भाषणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले असून त्यांनी विकासकामांऐवजी भलत्याच मुद्यांचा उपयोग केला असून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा विसर पडल्याचा टोला मारला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजच्या मास्टर सभेत विरोधकांवर टिकास्त्र सोडले. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, महागाईबद्दल का बोलत नाही, असा सवाल मा. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला. राज्यातील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा म्हणून पंतप्रधानांनी सांगितल्याचाही त्यांना राग आला. पण उद्धव ठाकरे विसरले की, पेट्रोल डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करून त्यांचे सरकार महाराष्ट्रातील जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देऊ शकते. असा दिलासा गुजरात आणि इतर राज्यांनी दिला आहे. स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसर्‍याला सवाल विचारणे म्हणजे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे लक्षण आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले, शेतकर्‍यांची वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापली, हजारो एकरांवर अजूनही ऊस तसाच उभा आहे आणि ऊसाचे गाळप होत नाही म्हणून शेतकर्‍याने आत्महत्या केली. अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल त्यांनी उल्लेखही केला नाही. विकासकामे म्हणून मुंबई महापालिकेने केलेले शाळांचे काम सांगणार्‍या उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसला असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे.

Exit mobile version