Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चांदणी तलाव अन् रामेश्वर मंदिराच्या भिंतीचा जीर्णोद्धार करावा – आ. डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंदखेडराजाच्या चांदणी तलावाची भिंत अन् ग्रामदैवत रामेश्वर मंदिराच्या पडलेल्या भिंतीचा तात्काळ जीर्णोद्धार करावा अशी मागणी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक चांदणी तलावाची भिंत पोखरली असून ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिराची भिंत ढासळली आहे. तलावाची अवस्था अशीच राहिली तर हा तलाव फुटून शेकडो एकर जमिनीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सिंदखेडराजा येथील या ऐतिहासिक वास्तूंचा तातडीने जीर्णोद्धार करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी. त्यासाठी केंद्र व राज्य पुरातत्व विभागाला निर्देश देण्यात यावे. अशी मागणी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र  शिंगणे यांनी आज, गुरुवार दि. २५ ऑगस्ट रोजी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सिंदखेडराजा भेटीचे निमंत्रणही डॉ. शिंगणे यांनी दिले.

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील अनेक वास्तू या ५०० ते ६०० वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत. दि. १ एप्रिल २०२२ रोजी ऐतिहासिक चांदणी तलावाची भिंत पोखरली आहे. मात्र त्याकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याचे डॉ. शिंगणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ३ एप्रिल २०२२ रोजी सिंदखेडराजाचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिराची भिंत पडली असून ती नव्याने बांधण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. शिंगणे म्हणाले. या वास्तूंच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांनी अनेकदा आंदोलने केली, पाठपुरावा केला मात्र राज्य व केंद्राच्या पुरातत्त्व विभागाला जाग येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सांस्कृतिक कार्यमंत्री हे विदर्भाचे आहेत अन् सिंदखेराजासुद्धा विदर्भातच आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा या दोन वास्तूंच्या डागडुजीसाठी पुरातत्व विभागाला निर्देश द्यावेत असे आमदार डॉ. शिंगणे म्हणाले.

   

मातृतीर्थाच्या विकासासाठी १८० कोटी रुपयांचा प्रस्ताव –

 

सिंदखेडराजाच्या विकासासाठी १८० कोटी रुपयांचा प्रस्ताव आम्ही तयार आहे. आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, वन, पर्यटन या सगळ्या बाबींचा त्यात समावेश आहे. शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर आपण त्याला मंजुरी द्यावी आणि सिंदखेडाजा येथे भेट द्यावी. अशी मागणी  आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

 

काय म्हणाले सांस्कृतिक कार्यमंत्री ? –

 

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेले सर्वच मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. आपण लवकरच या भागाची पाहणी करणार असल्याचा शब्द मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. विदर्भातील सर्वच ऐतिहासिक वास्तुसंबंधी केंद्रीय मंत्र्यांसोबत एक बैठक लावण्यात येईल. राज्यातील ऐतिहासिक वास्तूंचे  संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार निधी पुरविण्याची योजना करेल असे उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Exit mobile version