Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कन्नड घाटात वाहतुकीची कोंडी; युध्द पातळीवर काम सुरू

चाळीसगाव प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात दरडी कोसळल्याने अनेक तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. तर आता तातडीने रस्ता मोकळा करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगावसह परिसरात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तितूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे चाळीसगाव शहरातील बर्‍याचशा भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

तर दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या कन्नड घाटात रात्रीच्या सुमारास दरडी कोसळल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. गेल्या अनेक तासांपासून यामुळे दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली आहेत. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. मात्र मुसळधार पावसामुळे रस्ता मोकळा करण्यात अनेक अडचणी आल्या. महामार्ग सुरक्षा पथकाचे उपनिरिक्षक भागवत पाटील हे सहकार्‍यांसह घटनास्थळी असून महामार्ग मोकळा करण्यासाठी मदत करत आहेत.

आज पहाटेपासून जेसीबीच्या मदतीने कोसळलेल्या दरडीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युध्द पातळीवरून सुरू झाले असून लवकरच मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी कन्नड घाटातून प्रवास करण्याचे टाळावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. कुणाला औरंगाबाद येथे जावयाचे असल्यास नांदगाव मार्गे वा जळगावमार्गे रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version