Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कलामहर्षी केकी मूस यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

चाळीसगाव प्रतिनिधी । जगप्रसिद्ध छायाचित्रकार व कलावंत केकी मूस यांच्या जीवनावर आधारित संकेतस्थळाचे लोकार्पण खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

केकी मूस यांच्या जीवनावर आधारित https://kekimoosfoundation.org संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. ही वेबसाईट इंग्रजी भाषेत असून वर्डप्रेस या सीएमएसवर तयार करण्यात आलेली आहे. यात बाबूजींच्या जीवनकार्यासह त्यांच्या कलाकृतींबाबत माहिती देण्यात आलेली आहे. या संकेतस्थळाचा लोकार्पण होत असल्याने बाबूजींच्या अनमोल कलाकृती सार्‍या विश्‍वाला एका क्लिक वर पाहता येणार असल्याचा आनंद आहे अशी भावना खासदार पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

कार्यक्रमास केकी मूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकनराव गायकवाड, सचिव कमलाकर सामंत, भिकन वाणी, अनंत सामंत, छायाचित्रकार नीलेश काकडे, केकी मूस आर्ट गॅलरीचे व्यवस्थापक मनोज घाटे, माजी पं.स. सदस्य जगन महाजन, वास्तुविशारद किरण देशमुख, डॉ.तुषार राठोड, नरेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार पाटील यांनी या संकेतस्थळामध्ये बाबूजींच्या सहवासात आलेल्या व्यक्तींच्या चलचित्र प्रतिक्रिया समाविष्ट करण्याची सूचना करत प्रतिष्ठानच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष भिकन गायकवाड यांच्या हस्ते खासदार पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

नवीन संग्रहालयाची निर्मिती खासदार पाटील यांच्या प्रयत्नातून करण्यात आली आहे. त्यातून बंगल्याशेजारी तीन मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बाबूजींच्या सर्व माहितीचे संकलन नवीन इमारतीत केल्याने चित्रकलेचा व शिल्पकलेचा वारसा पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. यासोबत नवीन विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

Exit mobile version