Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोक कलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय मदत मिळवून द्या -खा. पाटील यांना साकडे

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे वाघ्या-मुरळीसह अन्य लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाने आपल्याला मदत करावी असे साकडे खा. उन्मेष पाटील यांना कलावंतांनी घातले आहे. यासाठी आज त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.

वाघ्या मुरळी तसेच अन्य लोक कलावंत अनादि कालापासून आपल्या कला सादर करून धर्मजागरण कुळधर्म कुळाचार पालन समाज प्रबोधन याद्वारे समाजसेवेचे कार्य करीत आहेत. समाजातील भावी भक्तांचे आशयावर वाघ्या मुरळी कुटुंबाचा उदरनिर्वाह आजपर्यंत सुरू होता. गेल्यावर्षी अतिवृष्टी नंतरच्या निवडणूक आचारसंहितेमुळे कलावंतांना जगण्यासाठी अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. तसेच यंदा मार्च अखेरपासून चालू असलेल्या कोरोना महामारी मुळे जागरण गोंधळ कार्यक्रम करता येणे शक्य नसल्याने वाघ्या-मुरळी कलावंतांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याच्या कोरोना महामारी परिस्थितीमध्ये आणखी काही महिने या लोक लोककलावंतांना उत्पन्नाचा आधार नसल्याने आम्हाला उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान मंजूर करा या मागणीसाठी वाघ्या मुरळी कलावंतांनी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या कार्यालयात आज सवाद्य मिरवणूक काढून निवेदन दिले.

खासदार पाटील यांना दिलेल्या निवेदना मध्ये वाघ्या मुरळी कलावंतांच्या मुला मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा. वाघ्या-मुरळी लोक कलेस शासनाकडून अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करण्यात यावी, कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन व घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी, वाघ्या-मुरळी कलावंतांना कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी, मर्यादित कलावंत संख्या, मंजुरी, नियम पालनाद्वारे गरण गोंधळाचे कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन यांनी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या कार्यालयात या निवेदनाचा स्वीकार केला.

याप्रसंगी चाळीसगाव तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, भडगाव तालुका अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्यासह बाळू नाना दत्तबर्डीकर, विलास वाघ धामणगाव, धोंडू बिल पिंजरपाडा ,सुभाष गायकवाड मेहुणबारे, वसंत भोळे, मांगीलाल महाजन ,आधार मोरे ,हनुमंत चव्हाण, शिवदास चव्हाण, नाना कोळी, मांगीलाल महाजन, रघुनाथ गोंधळी, वकील घोडे ,वाल्मीक सुपलकर, अशोक कांबळे, भिकन महाजन,काशिनाथ गोंधळी, भडगाव तालुकाध्यक्ष विजय सूर्यवंशी, निंबा मोरे, संतोष मोरे, सुनील सरदार, विजय सोनवणे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भावना व्यक्त करताना या कलाकारांनी खंडोबाचे भक्तीगीत येळकोट येळकोट जय मल्हार सादर करून आपल्या मागण्या चे निवेदन दिले. राहुल
आगोणे, राहुल आहिरे अशोक कांबळे या कलावंतांनी खंडोबा भक्तीगीत जागर करून निवेदन सादर करीत लक्ष वेधले. खासदार उन्मेषदादा पाटील यांनी वाघ्या मुरळी कलावंतांना शासनाकडून त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये भक्कम पाठपुरावा करतो असे आश्‍वासन देऊन त्यांना दिलासा दिला.

Exit mobile version