Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजितदादा पवार चाळीसगावात दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार जिल्हा दौर्‍यावर येत असून ते चाळीसगावात दाखल झाले आहेत.

राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत असून या अनुषंगाने ते आज सकाळी नऊच्या सुमारास माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या राजगड या निवासस्थानी दाखल झाले आहेत. देशमुख कुटुंबासह स्थानिक पदाधिकार्‍यांशी वार्तालाप करून ते भडगावमार्गे पाचोरा येथील कार्यक्रमात जाणार आहेत.

असा आहे अजितदादा पवार यांचा दौरा

दिनांक १५ रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास अजितदादा पवार यांचे चाळीसगावात माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे. यानंतर ते पाचोरा येथे रवाना होणार आहेत.

पाचोरा येथे गो. से. विद्यालयाच्या प्रांगणात जिजाई रंगमंचाचे उदघाटन अजितदादा पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार एकनाथराव खडसे यांची उपस्थिती राहणार आहे. यानंतर, एम.एम. कॉलेजात मुक्त विद्यापीठाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपुजन त्यांच्या हस्ते होणार असून नंतर ते पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पक्षाच्या मेळाव्याला संबोधीत करणार आहेत.

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर ते दुपारी पावणेतीन वाजता जळगावातील राजे छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजीत पक्षाच्या जिल्हा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधतील.यानंतर सहा वाजता अजितदादा हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. यानंतर ते रोडमार्गे औरंगाबादला जाणार आहेत.

Exit mobile version