Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करा- आ. चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकर्‍यांची ज्वारीच्या बियाण्यात फसवणूक झाली असून या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली असून याबाबत त्यांनी कृषीमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

ज्वारीच्या बोगस बियाण्यांमुळे चाळीसगाव तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. यानुकसानी संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले,

हायटेक कंपनीच्या ३२०६ या ज्वारी वाणाच्या कणसांना दाणेच न आल्याने शेतकर्‍यांची फसवणूक झाली. या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकर्‍यांच्या झालेल्या कोट्यवधींच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली.

या बाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ राज्याचे गुण नियंत्रक संचालक यांना चौकशीचे आदेश देऊन सबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले, तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. तर कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनीही या प्रकरणात स्वतः लक्ष घालून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत यावेळी माजी आमदार तथा कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, भाजपा शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

Exit mobile version