Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाढनिवासानिमित्त आ. मंगेश चव्हाण घेणार ‘आपुलकीची भेट’ !

चाळीसगाव प्रतिनिधी | ‘आपुलकीची भेट’ या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण हे मतदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा आमदार म्हणून विधानसभेत पाऊल ठेवणार्‍या मंगेशदादा चव्हाण यांनी गत दोन वर्षात शेतकरीयोद्धा म्हणून महाराष्ट्रभर लौकीक निर्माण केला आहे. आंदोलनकर्ते आमदार असे वलय देखील त्यांच्या नावाभोवती निर्माण झाले आहे. दि.२३ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले असून पूर्वसंध्येला दि.२२ ऑगस्ट रोजी ते आदिशक्तिचे जागृत शक्तिपीठ असणार्‍या पाटणानिवासिनी माता चंडिकेचे सकाळी १० वाजता धर्मपत्नी शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण यांच्या समवेत दर्शन घेणार आहेत. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ते देवीला चाळीसगावकरांना सुदृढ आरोग्य लाभू दे. असे साकडे घालणार आहेत.

आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सहा वाजता य. ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात हभप निवृतीनाथ महाराज (इंदुरीकर) यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तन कार्यक्रमात आषाढी एकादशीनिमित्त शिवनेरी फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय भजन व भक्तिगीत स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतीचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.

दरम्यान, वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे २३ आगस्ट रोजी श्रावणी सोमवारच्या प्रासादिक मुहुर्तावर आ. मंगेश चव्हाण व सौ.प्रतिभा चव्हाण हे सकाळी आठ वाजता समस्त चाळीसगावकरांचे ग्रामदैवत असणार्‍या आनंदा मातेचे दर्शन घेऊन संकिर्तन आरती करतील. यानंतर शिवनेरी या निवासस्थानी त्यांच्या आई कमलबाई व वडिल रमेश चव्हाण हे त्यांचे औक्षण करुन त्यांना आशीर्वाद देतील.

दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत जनतेच्या शुभेच्छा स्विकारुन आ. चव्हाण हे त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधतील. आ. चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थितांसाठी सुग्रास स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन भारतीय जनता पक्ष, चाळीसगाव ग्रामीण व शहर आणि मित्रपरिवाराने केले आहे.

Exit mobile version