चाळीसगावातील रस्ते टाकणार कात : २२ कोटींचा निधी मंजूर

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने तालुक्यातील २६ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) अंतर्गत २२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) च्या कामाला भाजपा – सेना युती सरकारने गती दिली असून अवघ्या दोन महिन्यात केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यासाठी २०३९ कोटींच्या निधीतून २५५१ किमीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे. त्यात केंद्र शासनाचा १२१८ कोटी व राज्य शासनाचा ८२१ कोटी असा सहभाग असणार आहे.

यात आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भरीव निधी मिळाला आहे. चाळीसगाव मतदारसंघातील पातोंडा – वाघडू -रांजणगाव – राष्ट्रीय महामार्ग २११ (१०.४३ किमी) आणि शिंदी – हिरापूर – अंधारी – तमगव्हाण (१५.९४ किमी) या दोन रस्त्यांचा समावेश आहे. त्यातील हिरापूर – अंधारी – तमगव्हाण या रस्त्याला काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात ६ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याची निविदा देखील निघाली आहे. मात्र सदर रस्त्याची तातडीने सुधारणा होणे गरजेचे असल्याने त्याऐवजी रस्त्याचा पुढील भाग या कामात समाविष्ट करण्यात यावा अशी देखील आपण शिफारस शासनाकडे करणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सदर दोन्ही रस्त्यांसाठी २२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिशभाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील आदींचे आभार मानले आहेत.

Protected Content