Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी कारवाई : चाळीसगावात सत्तर लाखांचा गुटखा पकडला !

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील बस स्थानकासमोरून जाणार्‍या एका कंटेनरला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी पकडला आहे. कंटेनरची तपासणी केली असता त्यात एकूण ७० लाख २६ हजार रुपयांचा गुटखा मिळून आला आहे. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील भडगाव रोडवरील बस स्थानकासमोरून आज दुपारी एक कंटेनर (क्र. एच.आर. ७४ बी २४९०) जात असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला थांबवले. आणि त्याची कसून तपासणी केली असता त्यात गुटखासह एकूण ७० लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. व पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी कंटेनरसह चालक नसीब खान हुसेन खान रा. फरिदाबाद राज्य हरियाणा व अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या कारवाईमुळे अवैध धंदे करणार्‍यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

Exit mobile version