Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवस्मारकाच्या आगमनाने चाळीसगावातील नेत्यांमध्ये अभूतपुर्व एकोपा !

चाळीसगाव, जीवन चव्हाण | शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी सर्व भेदाभेदाच्या भिंती गळून पडत चाळीसगावकरांच्या एकतेची वज्रमूठ दिसून आली. यात सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे अभूतपुर्व दृश्य देखील सर्वांना अनुभवता आले. यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये दिसलेला एकोपा हा विकासकामांमध्येही दिसावा ही अपेक्षा आता चाळीसगावकर व्यक्त करत आहेत.

शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आगमनाने चाळीसगावातील तमाम पक्षाचे नेते एका छताखाली आल्याचे सुखद चित्र काल दिसून आले. त्यामुळे विकासकामांसाठी ही या नेत्यांनी एकत्रित येऊन विकासकामे केली पाहिजे अशी चर्चा समाज माध्यमात सुरू आहेत.

खरं तर, चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा यासाठी गेल्या अनेक सामाजिक संघटनांनी संघर्ष केल्या. प्रदिर्घ काळानंतर या मागणीला यश आले आहेत. सदर पुतळ्यासाठी शासनाकडून एकूण ६० लाख ३४ हजारांचा निधी मंजूर झाला. त्या निधीतून २१ फूट लांबीच्या पुतळा तयार करण्यासाठी एकूण ५८ लाख ५० हजार एवढा खर्च आले. एका वर्षांनंतर त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथून पिलखोड, आडगाव, टाकळी, बिलाखेड मार्गाने चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी चौकात रविवार रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचे ढोल ताश्याच्या गजरासह जल्लोषात स्वागत करण्यात आले.

तालुक्यातील पिलखोड येथून पुतळ्याच्या आगमनाला सुरूवात झाली. दरम्यान खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह विविध पक्षांचे नेते पुतळ्याचे स्थानापन्नसाठी एकत्रित आल्यामुळे अभुतपुर्व क्षण अनेकांना टिपता आले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या स्थानापन्नसाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत जल्लोषात स्वागत केले. त्याचप्रमाणे चाळीसगाव शहराच्या विकासकामांसाठी एकत्रित येऊन विकासकामे केली पाहिजे अशी चर्चा आता समाज माध्यमात रंगु लागली आहे. त्याचबरोबर सामाजिक, संस्कृतीक, विकासकामांत येथून पुढे राजकारण केले जाऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी प्रतिक्रियांद्वारे उमटवली आहे. कायम एकमेकांच्या विरोधात राजकारण करणार्‍यांना शिवस्मारकाने एकत्र आणले हे देखील तितकेच खरे….

Exit mobile version