Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी अवतरण दिनानिमित्त दीपोत्सव

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी अवतार दिनाचे औचित्य साधून गुरूवारी सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.

महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी अवतार दिन गुरुवारी (ता. २०) असून, कोरोना संक्रमणामुळे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता घरोघरी दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री चक्रधर स्वामींच्या अवतरणाला २० ऑगस्टला ८०० वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे या दिवशी अवतार दिनाच्या कार्यक्रमावेळी आरती करून प्रत्येकाने आठ दिवे लावून उत्सव साजरा करण्याचे आवाहन जाळीचा देव येथील आचार्य लोणारकर महानुभाव यांनी केले आहे.

चक्रधर स्वामी यांच्या अवतरणाच्या अष्टशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, सध्या सुरू असणार्‍या कोरोनाच्या आपत्तीमुळे हा पावन दिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. महानुभाव पंथियांनी सर्व नियमांचे पालन करून हा दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुढील एक वर्ष हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त वर्षभर विविध प्रबोधनात्मक ऑनलाइन कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये चक्रधर स्वामींचे कार्य, त्यांनी जगाला दिलेला संदेश यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Exit mobile version