Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा आरक्षणासाठी केंद्राने अध्यादेश काढावा – अशोक चव्हाण

मुंबई प्रतिनिधी । मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षण याचिकेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या अ‍ॅटर्नी जनरलना नोटीस काढली आहे. त्यामुळे केंद्राने या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे. केंद्राला या संदर्भात पत्र लिहिण्यास आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत. आरक्षणाचे तमिळनाडूतील प्रकरण, आर्थिकदृष्टया मागासवर्गीयांचे आरक्षण इत्यादी प्रलंबित प्रकरणांबद्दल केंद्राने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा विषय नव्या सूचित घेण्याचा निर्णय घेऊन याप्रकरणी केंद्राने अध्यादेश काढावा आणि मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवावा अशी मागणी देखील अशोक चव्हाण यांनी केली. तर, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या टीकेवरून ते म्हणाले की त्यांनी मला मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी मला नियुक्त केलेले आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीत आहे. तसेच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात नव्हता, असे अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

Exit mobile version