Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आगामी सण व उत्सव शांततेत साजरे करा : पोलीस प्रशासन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी काळात येणारे गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी येथील पोलीस ठाण्याची वतीने आयोजित शांतता समिती सदस्यांच्या बैठकीत केले.

आगामी गणेशोत्सव ईद-ए-मिलाद नवरात्री उत्सव शांततेत पार पडावे यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील पोलीस पाटील उत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांची बैठक पार पडली. यावल येथील धनश्री चित्र मंदीरच्या सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीला अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह पोलीस उपविभागीय उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या सर्व प्रमुख सहकारी उपस्थित होते .

याप्रसंगी चंद्रकांत गवळी म्हणाले की, आपल्या देशात अनेक जाती- धर्माचे, लोक राहतात त्यामुळे विविध जाती धर्मानुसार सण उत्सव साजरे करत असतो आपण सर्व भारतीय समजून एकमेकाचे उत्सव शांततेत व उत्साहात पार पडतील व कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याची आपण प्रत्येकाने दक्षता घ्यावी. आगामी उत्सव शांततेत पार पडतील असा आत्मविश्वास अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी व्यक्त केला.

बैठकीत पोलीस उप अधीक्षक डॉ. कुनाल सोनवणे,हाजी शब्बीर खान, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे,डॉ.निलेश गडे, पोलीस पाटील संघटनेचे ज्ञानेश्वर महाजन आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.
मंडळ पदाधिकार्‍यांनी बैठकीत विसर्जन मिरवणुकीतील शहरातील प्रमुख मार्गावरील रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्याच्या सूचना मांडल्या असता या सूचना संबंधित विभागाकडे पाठवून विसर्जन मिरवणुकी पूर्वी तक्रारी दूर करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मंडळांना आश्वस्त केले.

बैठकीस निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी ,पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे,पोलिस उप निरिक्षक मुजफ्फर पठाण,पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील व यावल तालुक्यातील विविध गावातील पोलीस पाटील शांतता समिती सदस्य मंडळाचे पदाधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version