Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोहारा येथे गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले; चालक ताब्यात

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा गावाजवळून निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर बजरंग दलाच्या कायकर्त्यांच्या मदतीने पोलीसांनी कारवाई केली असून एकाला ताब्यात घेतले आहे. यात सहा बैलाची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला (एमएच ०४ एफडी ७८४६) क्रमांकाचे टेम्पो वाहन उभे असल्याचे गावातील महेंद्र घोंगडे व आप्पा चौधरी यांच्या निदर्शनास आले. त्यात बैल असल्याचे दिसून आले. यासंदर्भात बजरंग दल कार्यकर्ता यांनी गाडीच्या चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. शंका आल्यावर बजरंग दल संयोजक महेंद्र घोंगडे आणि हेमंत गुरव यांनी  तात्काळ पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, वरिष्ठ पोलीस अधिकारी एडिशनल एस. पी. चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, पाचोरा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांच्याशी फोनवरून संपर्क करून सदर विषयाची सविस्तर माहिती दिली.  वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार सदरील गुरांची गाडी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. यात पंचनामा करून ६ बैलांची सुटका करण्यात आली. त्यांना वरखेडी येथील महावीर गौशाळा येथे रवाना करण्यात आले. पोलीसांनी वाहनासह ३ लाख ६७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  पोलीस नाईक अरुण राजपूत यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीसात  गुन्हा दाखल करण्यात आला असून मुजाहिद रफीक शेख रा. रा. मुल्लावाडा, पाचोरा आणि आबीद खान अकमल खान (वय-४०) रा. इस्लामपूर चाळीसगाव या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. लोहारा येथील रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी, लोहारा बजरंग दल शाखा संयोजक महेंद्र घोंगडे, सह संयोजक राहुल चौथे,  लोहारा गौरक्षा प्रमुख गजानन चौधरी यांन सहकार्य केले. पुढील तपास पोलीस हवालदार अरविंद मोरे हे करीत आहे.

Exit mobile version