Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात २०० रासेयो स्वयंसेवकांच्या शिबीराला सुरूवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आजच्या तरूण पिढीने ज्ञान आणि क्षमतेला गुरूस्थानी ठेवावे, अभिमान आणि अहंकार यातील फरक समजून घेत, सृजनशीलतेला महत्व द्यावे तसेच शिस्तीसोबत वेळेचा सन्मान करावा, यातूनच उद्याचा विकसित भारत निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली, रा.से.यो. प्रादेशिक संचालनालय व रा.से.यो. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर पासून राष्ट्रीय एकात्मता शिबीराला प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन करतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी बोलत होते. यावेळी प्र- कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, युथ ऑफिसर सुमंतकुमार यादव यांची उपस्थिती होती. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात या कार्यक्रमाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन झाले.

कुलगुरू म्हणाले की, या शिबिराच्या माध्यमातून विविध राज्यांच्या सामाजिक, सांस्कृतिकतेची ओळख होणार आहे. या शिबीरातून देशाच्या विविधतेसोबतच संवेदनशील तरूण पिढी निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. जगात सर्वाधिक तरूण लोकसंख्या भारताकडे आहे. त्यामुळे विकसित राष्ट्र होण्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. होणाऱ्या चुकांपासून धडा घ्या आणि चांगले मित्र सोबतीला ठेवून त्यांच्यातील आणि आपल्यातील क्षमता ओळखून रणनिती तयार करा असे आवाहन त्यांनी केले. राजेंद्र नन्नवरे यांनी यावेळी ‘जन्मभूमी, कर्मभूमी स्वर्गसे महान है’ हे गीत सादर केले. रा.से.यो.चे विभागीय संचालक श्री. अजय शिंदे यांनी या शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. रा.से.यो.संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.

या शिबिरात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, आसाम, तेलंगणा आणि ओरीसा या दहा राज्यातून एकूण २१० रा.से.यो. स्वयंसेवक आणि १५ कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले आहेत. एका राज्यातील पाच विद्यार्थी व पाच विद्यार्थिनी आणि महाराष्ट्राच्या अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे.  उद्या १ डिसेंबर रोजी राजेंद्र नन्नवरे यांचे पंचप्रण या विषयावर व्याख्यान होईल. त्या आधी योगा होणार आहे. व्याख्यानानंतर गटचर्चा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

Exit mobile version