शेळगाव, हतनूर व वरणगाव-तळवेल सिंचन योजनांना सुधारित मान्यता

मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणार्‍या शेळगाव बंधारा, हतनूर प्रकल्पातील बाकी असणारी कामे आणि तळवेल येथील उपसा जलसिंचन योजना या तीन महत्वाच्या प्रकल्पांना आज सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे. या तिन्ही योजनांसाठी अनुक्रमे ९६८.९८ कोटी; ५३६.०१ कोटी आणि ८६१.११ कोटी रूपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या माध्यमातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील प्रलंबीत सिंचन योजनांना चालना दिल्याचे दिसून आले आहे.

शेळगाव बंधारा ठरणार वरदान

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना अद्यापही प्रलंबीत आहेत. यातील शेळगाव बंधारा, हतनूर आणि वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. या तिन्ही प्रकल्पांना आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुधारीत मान्यता देण्यात आली. यात शेळगाव बंधार्‍यामुळे ४.५ टिएमसी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे यावल तालुक्यातील ९१२८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून हजारो शेतकर्‍यांचा लाभ होणार आहे. या बंधार्‍याचे काम सुरू असले तरी मध्यंतरी सुरू असणार्‍या रॅडल गेटमुळे या प्रकल्पाची किंमत वाढली आहे. १९९७-९८ मध्ये या प्रकल्पाचे मूल्य १९८.०५ कोटी इतके होते. २०१६ साली याला ९६८.९७ कोटी रूपयांची द्वितीय सुधारित मान्यता प्रस्तावित करण्यात आली होती. आता यालाच मान्यता मिळाली असून याचमुळे या प्रकल्पाला वाढीव निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पुनर्वसीत क्षेत्रांमधील कामांना गती

हतनूर प्रकल्प हा जिल्ह्यातील जुन्या प्रकल्पांपैकी असला तरी यातही काही कामे प्रलंबीत आहेत. याचा प्रामुख्याने यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि चोपडा या तालुक्यांना लाभ होत आहे. या धरणामुळे २६८३८ हेक्टर जमीन ओलीताखाली आलेली आहे. हतनूर प्रकल्पाला १९६३-८४ मध्ये १२.०९ कोटी रूपयांची मान्यता मिळाली होती. यानंतर आजवर तीनदा सुधारित मान्यता मिळाली आहे. तर आता ५३६.०१ कोटी रूपयांची चौथी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे विस्थापीत झालेल्या पुनर्वसीत क्षेत्रातील काही कामे बाकी असून सांडव्याचे काम आणि धरणाचे कामही बाकी आहे. यासाठी आता सुधारीत निधीला मान्यता मिळाल्याने हे काम पूर्णत्वाकडे येणार आहे.

तीन तालुक्यांचा कायापालट

तर, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजना ही अतिशय महत्वाकांक्षी अशी आहे. यात हतनूर येथील धरणातून पाणी उपसा करून ते ओझरखेडा (ता. भुसावळ) येथील मातीच्या धरणात साठविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे बोदवड, मुक्ताईनगर आणि भुसावळ या तीन तालुक्यांमधील सुमारे १६९४८ हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे. तसेच दीपनगर येथील औष्णीक विद्युत केंद्रासाठीही येथील पाणी उपलब्ध होणार आहे. याच्या डिझाईनमध्ये थोडा बदल करण्यात आल्यामुळे याचे मूल्य वाढले आहे. या प्रकल्पाची १९९७-९८ मधील मूळ किंमत २२३.२४ कोटी रूपये इतकी होती. आता याला ८६१.११ कोटी रूपयांची प्रथम सुधारित मान्यता मिळाली आहे. अर्थात, यामुळे याच्या कामाला गती मिळणार आहे.

निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री ना. पाटील

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करून जिल्ह्यातील या तिन्ही महत्वाच्या जलसिंचन योजनांना वाढीव प्रशासकीय मान्यतेला मंजुरी मिळवून आणली आहे. याबाबत ना. पाटील म्हणाले की, शेती हा आपल्या समाजाचा कणा असून महाविकास आघाडी शेतकर्‍यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या तिन्ही प्रकल्पांचा लाभ हा कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांना होणार असल्याचा आपल्याला आनंद आहे. भविष्यातही याच प्रकारे विविध प्रकल्पांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content