Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बस दरीत कोसळली : अमळनेर तालुक्यातील महिला ठार; अन्य जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात तालुक्यातील मुडी येथील महिला ठार झाली असून याच गावातील काही प्रवासी जखमी झाले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील वणी-सप्तश्रुंगी घाटात आज पहाटे बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची मुक्कामी बस असून त्यात २४ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान बसला गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असतांना हा अपघात झाला.

सदर बस ही वणी येथे मुक्कामाला होती. आज सकाळी साडेसहा वाजता बस स्टॉपवरून निघाली. पण दहा बारा मिनीटानंतर गणपती पॉंइट येथे वळणावर वाहकाच्या लक्षात काही आले नाही. यामुळे ही बस सरळ थेट खोल दरीत कोसळली. यात एक महिला मयत झाली असून २१ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अशाबाई राजेंद्र पाटील ( वय अंदाजे ५५) ही महिला ठार झाली असून ती अमळनेर तालुक्यातील मुडी येथील रहिवासी आहे.

याच अपघातात २१ जण जखमी झाले असून यात मुडी येथीलच १२ जणांचा समावेश आहे. तर जळगावातील भोकर येथील एक जण जखमी झालेला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी याची माहिती जाणून घेतली. आणि ते जखमींची विचारपूस करण्यासाठी तात्काळ नाशिक येथे रवाना झाले आहेत.

दरम्यान, मुडी येथील २२ भाविक हे अलीकडेच पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. यातील काही जण हे शनि-शिंगणापूर तर उर्वरित वणी येथील गडावर दर्शनासाठी गेले होते. हेच भाविक आपल्या घरी परत येत असतांना त्यांच्या बसला अपघात झाला. आणि यातच मुडी येथील महिलेस प्राण गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या एसटी बसमध्ये एकूण प्रवासी २४ (चालक व कंडक्टर सह) प्रवास करत होते. यापैकी १ मयत (महिला-अशाबाई राजेंद्र पाटील, मुडी ता अंमळनेर) ०६ रुग्ण वणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १७ रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी शिफ्ट केले आहेत.

Exit mobile version