महिलेच्या घरात चोरी; ६ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास

पाचोरा, प्रतिनिधी | मेडिकल एजन्सीच्या संचालिका असणार्‍या महिलेच्या घरात चोरट्यांनी हात साफ करून तब्बल ६ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील राधाकृष्ण रेसिडेन्सी, रो हाऊस नं. ९, स्वप्नशिल्प हॉटेलच्या मागे मंगला वसंत सुर्यवंशी यांचे स्वतःच्या मालकीचे घर आहे. मंगला सुर्यवंशी यांची शहरातील बस स्टँड जवळ पाटील मेडिकल एजन्सी आहे. पती भारतीय वायु सेनेतुन सन – २००७ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. दरम्यान पती वसंत सुर्यवंशी यांचे आकस्मित निधन झाले. मंगला सुर्यवंशी ह्या दि. ११ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर पाटील (भाचा) याचे सोबत जळगांव येथे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान जळगांव येथुन खरेदी करुन आल्यानंतर त्या शहरातील ज्ञानेश्वर पाटील  यांचे घरी मुक्कामास थांबल्या होत्या. दि. १२ रोजी सुद्धा दिवसभर त्या भाच्याच्या घरीच काही कामानिमित्त थांबल्या होत्या. दि. १२ रोजी सायंकाळी शेजारी राहणार्‍यांनी मंगला सुर्यवंशी यांना तुमच्या घराचा दरवाजा उघडला आहे अशी माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली असता मंगला सुर्यवंशी ह्या तात्काळ घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजले.

मंगला सुर्यवंशी यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत घरातील ९० हजार रुपये किंमतीची ३० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, ९० हजार रुपये किंमतीचा ३० ग्रॅम वजनाची सोन्याचा चपलाहार, १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या ६० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या बांगड्या, ५१ हजार रुपये किंमतीचा १७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, १५ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील टोंगल, १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील काप, ९ हजार रुपये किंमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व मणी तसेच १ लाख ७७ हजार रुपये रोख असा ६ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबविल्या बाबत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील हे करत आहेत.

 

Protected Content