Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांद्रा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारादरम्यान म्हशीचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्रा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरेश पंडित पाटील यांच्या चार ते पाच दिवसांपूर्वी व्यालेल्या म्हशीला उपचारासाठी आणले होते. येथील कर्मचारी यांनी कॅल्शियमची सलाईन लावली असता उपचारादरम्यान पाच मिनिटांत म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

येथील पशुवैद्यकीय अधिकारी निलेश बारी यांच्याकडे नांद्रा, बांबरुड, लोहारा पशुवैद्यकीय दवाखान्यांचा पदभार आहे. परंतु ते आज कोणत्याही दवाखान्यात आलेले नाहीत. नांद्रा येथील कर्मचारी यांनी सुरेश पंडित पाटील यांच्या म्हैसीला कॅल्शियमची सलाईन लावून पाच मिनिटे होत नाही तोपर्यंत म्हैसीने थरकाप करत जागेवर जीव सोडल्याने शेतकऱ्यांचाही थरकाप उडाला. येथील कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे लाख रुपयांची पाच ते सहा लिटर दूध देणारी म्हैस डोळ्यासमोर गतप्राण झाली.

शेतकऱ्याने फोडलेला टाहो पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. दोन तासानंतर जळगाव येथून डॉ. निलेश बारी आपल्या फोरव्हीलरने दवाखान्यात पोचले. शेतकरी यांनी या सर्वांना जाब विचारला “डॉ. निलेश बारी जर दवाखान्यात उपचारा दरम्यान उपस्थित राहिले असते तर ही वेळ आली नसती. शेतीच्या कामांच्या दिवसांवर शेतकऱ्यांला मोठा आर्थिक फटका बसला आहे.” असे म्हणत या उपचारादरम्यान मृत्यूस कारणीभूत असलेल्या कर्मचारी व डॉ यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकरी सुरेश पाटील यांनी केलेली आहे. नागपंचमीच्या दिवशी व्यालेल्या म्हशीचे पारडू ठणठणीत आहे.               

यावेळी, “शंभर गुरांमागे एकाद्या जनावरांला कॅल्शियम दिल्यामुळे हार्ड ड्राइव्ह होऊन ते दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेच काही झाले असावे. माझ्याकडे चार ते पाच दवाखान्यात उपचारा दरम्यान मी उपलब्ध राहू शकत नाही. पशुवैदकीय दवाखान्यात कर्मचाऱ्यांची फारच कमतरता आहे.” असे  नांद्रा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश बारी यांनी सांगितले.

Exit mobile version