Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. रक्षाताई खडसेंच्या पाठपुराव्याने मिळणार ५२ टॉवर !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याने बीएसएनएलच्या फोर-जी सेवेसाठी ५२ नवीन टॉवर्स मिळणार आहेत.

खासदार रक्षाताई खडसे यांनी आज निवेदन जारी करून यात जिल्ह्यात ५२ ठिकाणी बीएसएएएलचे टॉवर्स मिळणार असल्याचे सांगितले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, डिजिटल सर्वसमावेशकता आणि संपर्क हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या ‘अंत्योदय’ दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग असून, देशातील ५ राज्यांमधल्या ४४ आकांक्षी जिल्ह्यांमधील ७,२८७ गावांना 4G मोबाईल सेवा पुरवण्यासाठीच्या प्रकल्पाला सरकारने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पूर्णतः पोहोचवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने ४जी मोबाईल सेवा, देशातल्या वंचित गावांमध्ये पोहोचवण्यासाठी एकूण रु.२६,३१६/- कोटी खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.

‘आत्मनिर्भर भारत’ योजनेत स्टॅक प्रणालीचा वापर करून भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) द्वारे हा प्रकल्प अमलात आणला जाईल. तसेच त्याला युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड मार्फत अर्थसहाय्य केले जाईल. त्यानुसार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जळगांव जिल्ह्यातील श्रेणी १ साठी २६ व श्रेणी २ साठी ८३ गावांची शिफारस केली होती. त्यापैकी श्रेणी १ साठी १५ तर श्रेणी २ साठी ३७ अशा एकूण ५२ गावांची ४जी सेवेसाठी निवड करण्यात आलेली असून, त्यासाठी राज्यतील महसूल विभागाकडून मोबाईल टॉवर उभारणीसाठी परवानगी घेण्यात येणार आहे. अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.

दरम्यान,हा प्रकल्प ग्रामीण भागात मोबाईल कनेक्टिविटी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाच्या दिशेने महत्वाचे पाउल आहे. हा प्रकल्प मोबाईल ब्रॉडबँडच्या माध्यमातून विविध ई-प्रशासन सेवा, बँकिंग सेवा, टेली-मेडिसिन, टेली-शिक्षण अशा विविध सेवा वितरणाला प्रोत्साहन देईल आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करेल. असे यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

Exit mobile version