Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेडीयूमध्ये भाऊबंदकी : राष्ट्रीय अध्यक्षांचा राजीनामा !

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | लोकसभा निवडणूक तोंडावर असतांनाच संयुक्त जनता दलातील वाद उफाळून आले असून यातूनच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री नितीश कुमार हेच पक्षाची धुरा सांभाळणार आहेत.

दिल्लीत शुक्रवारी झालेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नूतन अध्यक्ष नितीश कुमार यांना बनवण्याचा प्रस्ताव लालन यांनी स्वत:हून मांडला. याला एकमताने मंजूर करण्यात आला असला तरी आज दुपारच्या पत्रकार परिषदेत याची औपचारीक घोषणा होणार आहे.  नितीश दुसर्‍यांदा पक्षाचे अध्यक्ष बनले आहेत.

जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस दासाई चौधरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले- सर्वपक्षीय नेत्यांचे मत होते की प्रमुख चेहरा असल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश यांनी संघटनेची जबाबदारी स्वीकारावी. यानंतर नितीश म्हणाले की तुम्ही लोकांनी विनंती केली तर मी त्यासाठी तयार आहे. यानंतर त्यांची निवड करण्यात आली. तर लालन सिंह यांनी आपण बराच काळ पक्षाध्यक्ष पदावर असून मला निवडणूक लढवायची आहे आणि पक्षात इतर कामे करायची असल्याने राजीनामा देण्याचे नमूद केले.

दरम्यान, ललन सिंग यांच्या राजीनाम्याच्या मागे जेडीयूमधील भाऊबंदकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडच्या काळात सिंग यांची लालू यांच्याशी जवळीक वाढली होती. या पार्श्‍वभूमिवर नितीश यांनी सावध पवित्रा घेत पक्षाची सूत्रे अधिकृतपणे आपल्या हाती घेतली आहेत.

Exit mobile version