Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भाऊ-बहिणीला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टेलीफोन नगरात राहणारे नवीपेठ परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याला व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवत ५ लाख ६४ हजारांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भाऊ बहिणीला जळगाव सायबर पोलीसांनी राजस्थान येथील भिलवाडा येथून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील टेलीफोन नगरात आश्विन पटेल या व्यापाऱ्याला रसायन व्यवसायात गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलीसांनी दाखल गुन्ह्यात तपास करून राजस्थानातील भिलवाडा येथून संशयित आरोपी चंदाकुमारी उर्फ तानिया सत्यनारायण शर्मा (वय-३०) आणि भरत सत्यनारायण शर्मा, (वय-२७, भिलवाडा, राजस्थान) या भाऊ-बहिणीच्या जोडीला शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजत अटक केली. त्यांचेकडुन ४८ वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे २ मोबाईल फोन, ५ सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती यांनी दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचे तपासात सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिगंबर थोरात, पोहेका राजेश चौधरी, पोकॉ मिलिंद जाधव, गौरव पाटील, दिपक सोनवणे यांनी तांत्रिक मदत करत पोउपनि दिगंबर थोरात, पोहेका राजेश चौधरी, पोहेकॉ प्रविण वाघ, महिला पोहेकॉ दिप्ती अनफाट, पोकॉ मिलिंद जाधव यांनी दोघांना राजस्थानातील भिलवाडा येथे शास्त्रीनगर येथून अटक केली.

Exit mobile version