Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लादेनबाबत माहिती अमेरिकेला पुरवणाऱ्या ब्रिगेडियरला पाकिस्तानात फाशी

raja rizvan

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपल्याची अतिसंवेदनशील माहिती अमेरिकेला पोहोचविणारे गुप्तहेर ब्रिगेडियर राजा रिझवान यांना पाकिस्तानी लष्कराने कोर्ट मार्शलनंतर फाशी ठोठावण्यात आली आहे. ब्रिगेडियर रिझवान यांना फाशीवर लटकावण्याची शिक्षा देतानाच लेफ्टनंट जनरल जावेद इक्बाल यांना १४ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे.

 

पाकिस्तानी लष्कराने मे महिन्यात ब्रिगेडियर रिझवान आणि लेफ्टनंट जनरल जावेद इक्बाल यांच्यासह एका नागरिकाचेही कोर्ट मार्शल केले होते. या तिघांवर बाहेरील देशांसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.पाकिस्तान लष्कराच्या ‘पीके डॉट डिफेन्स’ या वेबसाईटने, तसेच ‘द प्रिंट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. ब्रिगेडियर राजा रिझवान यांनी आपल्या देशाविरुद्ध हेरगिरी केल्याच्या गु्न्ह्यात त्यांना फाशी देण्यात आल्याचे वृत्त पीके डॉट कॉमने दिले आहे. आता पर्यंत पाकिस्तानी लष्कराची मिडिया विंग आयएसपीआरने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, दोषी ठरलेले ब्रिगेडियर रिझवान यांनी आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, अशी विनंती पाकिस्तानी लष्कर प्रमुखांकडे केली होती. मात्र, त्यांची ही विनंती फेटाळून लावण्यात आल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.लेफ्टनंट जनरल जावेद इक्बाल हे पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील १११ व्या ब्रिगेडच्या कमांडरसह डीजीएमओसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम करून सन २०१५ मध्ये निवृत्त झाले. ज्या नागरिकाचे कोर्ट मार्शल करण्यात आले, तो काहोट येथील पाकिस्तानच्या अणु प्रकल्पात काम करत असे.आमच्याकडे रिझवान यांना फाशी दिल्याबाबतची माहिती आली आहे, मात्र या माहितीला दुजोरा मिळू शकलेला नाही, अशी माहिती भारतीय सुरक्षा आस्थापनेतील सूत्रांनी दिल्याचे द प्रिंटने म्हटले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातील मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनीही अद्याप हे फाशीचे वृत्त दिलेले नाही.

Exit mobile version