Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकिंग न्यूज : शिवसेना नेते राऊतांनी कदमांसह घेतली राज्यपालांची भेट

ravut

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, “ही एक सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा ठरत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे अशी मागणी केली आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. दरम्यान, राज्यपाल भेटीनंतर संजय राऊत ‘मातोश्री’कडे रवाना झाले असून या भेटीतील तपशील ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहेत.

 

संजय राऊत आणि रामदास कदम सुमारे तासभर राजभवनावर होते. राज्यपालांची भेट झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी माध्यमांपुढे येत भेटीचा तपशील दिला. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने राज्यपालांना भेटलो. ही आमची सदिच्छा भेट होती. या भेटीत बाळासाहेब ठाकरे यांचे फटकारे हे पुस्तक तसेच उद्धव ठाकरे यांची पाहावा विठ्ठल व गडकिल्ल्यांबाबतचे पुस्तक राज्यपालांना भेट दिले, अशी माहिती राऊत यांनी दिली. दरम्यान, सध्या महाराष्ट्राला जे राज्यपाल लाभले आहेत त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. आम्ही एका मर्यादेत राहून राज्यपालांशी चर्चा केली, असेही राऊत यांनी आवर्जून नमूद केले.

Exit mobile version