Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Breaking news : धावत्या रेल्वेखाली आल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज  प्रतिनिधी | रेल्वे लाईन क्रास करत असतांना दोन वृद्धांचा धावत्या रेल्वेसमोर सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान घडली असुन दुसखेडा येथुन परधाडे येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात जात असतांना वृद्धांवर काळाने घाला घातला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की, अशोक झेंडु पाटील (वय – ५५) व रत्नाबाई माधव पाटील (वय – ६२) रा. दुसखेडा ता. पाचोरा हे २४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुसखेडा येथुन परधाडे येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पायी निघाले होते. दरम्यान मध्ये रेल्वे लाईन आहे. ४:३० वाजेच्या सुमारास रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३८० / ३७ / ३९ नजीक लाईन क्रास करत असतांनाच अचानक भुसावळ कडुन मुंबईच्या दिशेने जाणारी कामायनी एक्सप्रेस भरधाव वेगाने येत होती. अशोक पाटील व रत्नाबाई पाटील यांच्या लक्षात येईल तोपर्यंत खुप उशीर झाला होता. भरधाव कामायनी एक्सप्रेसने दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत अशोक पाटील व रत्नाबाई पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल भगवान बडगुजर हे तात्काळ रुग्णवाहिका चालक किशोर लोहार व अमोल पाटील यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काॅ. तुषार विसपुते हे करीत आहे.

Exit mobile version