ब्रेकींग : बावरी गँगच्या ५ जणांवर ‘मोक्का’ची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊल उचलली जात आहे. या अनुषंगाने जळगाव शहरातील एका कुटुंबातील पाच जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी काढले आहे.

मोनुसिंग जगदिशसिंग बावरी (वय-२३), मोहनसिंग जगदिशसिंग बावरी (वय-१९), सोनुसिंग जगदिशसिंग बावरी (वय-२५), जगदिशसिंग हरिसिंग बावरी (वय-५२), सतकौर जगदिशसिंग बावरी (वय-४५) (सर्व रा. सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या एका कुटुंबातील पाच जणांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तांबापूरा परिसरात राहणारे बावरी कुटुंबियातील सदस्यांवर जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या दरोडा, जबरी लूट, हाणामारी, चोरी करणे, दमदाटी, तिक्ष्ण हत्यार सोबत ठेवून दहशत माजविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांना या टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यात मोक्का कायदयाचे कलम वाढवण्यासह प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तयार केलेला मोक्का प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत पोलिस अधिक्षक यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने पाचही संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोक्का कायदयाखाली कलम लावण्यात आले. या प्रस्तावासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे तसेच एमआयडीसी पो.स्टे. चे पो.नि. जयपाल हिरे, पोउनि रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ सचिन मुंडे, पोना योगेश बारी, पोना सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content