Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : ‘त्या’ हेलीकॉप्टर अपघातात १३ जणांचा मृत्यू

चेन्नई वृत्तसंस्था | आज कुन्नुर परिसरात झालेल्या हेलीकॉप्टर अपघातामध्ये हेलीकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या हेलीकॉप्टरमध्ये चीफ ऑफ आर्मी स्टॉफ म्हणजेच लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत हे देखील स्वार होते. त्यांच्याबाबत सरकारतर्फे अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या संदर्भात वृत्त असे की, तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज लष्कराचे हेलीकॉप्टर कोसळले. यात लष्करप्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग,जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा आणि हवालदार सतपाल वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार खराब हवामानामुळे हेलीकॉप्टर डोंगराळ परिसरात कोसळले. परिसरातील लोकांनी धाव घेऊन मदतकार्य केले. मात्र हा अपघात इतका भीषण होता की यात तेरा जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर वेलींग्टन येथील रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मृतदेह छिन्नावस्थेत असल्यामुळे डीएनए चाचणीच्या आधारे मृतदेहांची ओळख पटविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भात मंत्रीमंडळाला माहिती दिली. संरक्षण मंत्री सिंह यांनी रावत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कन्येला या अपघाताबाबत माहिती दिली. दरम्यान, आज ते संसदेत माहिती देण्याची शक्यता होती. मात्र आता ते या अपघाताबाबत उद्या संसदेत निवेदन करणार आहेत.

बिपीन रावत यांची तेजस्वी कारकिर्द

बिपिन रावत हे देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. अर्थात भूदल, नौदल आणि हवाई दलाचे ते संयुक्त प्रमुख असून या तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम ते करत आहेत.

बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस. रावत हेदेखील लष्करात होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

यानंतर भारतात परतल्यानंतर गोरखा ११ रायफल्सच्या ५व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं. रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले. त्यांची भारतातील पहिली सीडीएस अधिकारी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

Exit mobile version