पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेच्या वाचनालयात पुस्तके भेट

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेला अमळनेरातील मिल के चलो असोसिएशन व समकालिन प्रकाशन पुणे यांच्यावतीने शाळेच्या ‘पूज्य साने गुरूजी’ वाचनालयाला १५ दर्जेदार पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला.

 

पिंगळवाडे येथील शिक्षकवृंदातर्फे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरु असणाऱ्या कार्यास हातभार लागावा म्हणून पुस्तकरुपी भेट संस्थेमार्फत शाळेपर्यंत पोहोचवण्यात आली. मिल के चलो असोशिएशन अमळनेर संस्थेच्या कार्याची ओळख करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी केले. शाळेतील उपशिक्षिका वंदना सोनवणे यांनी विद्यार्थीनींच्या मदतीने शाळेत उपलब्ध पानाफुलांचे “नॅचरल बुके” तयार करुन पाहुण्यांचे अनोखे स्वागत केले. अवांतर पुस्तक वाचन आपल्या बुद्धीविकासासाठी किती आवश्यक आहे, याचे महत्व मिलके चलोचे संस्थापक अनिरुद्ध पाटील आणि त्यांचे सहकारी प्रा.विनायक पाटील यांनी सोप्या शब्दात मुलांना पटवून दिले.

 

अनिरुध्द पाटील व विनायक पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विचारलेल्या प्रश्नांची शाळेतील विद्यार्थ्यांनी तत्परतेने व समर्पक उत्तरे दिल्याने उभयतांनी विद्यार्थ्यांचे व शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास घडविणाऱ्या शिक्षकवृंदाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक रविंद्र पाटील व आभारप्रदर्शन शाळेचे पदवीधर शिक्षक प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रमास शाळेला नेहमीच मदतीसाठी तत्पर असणारे शिक्षणप्रेमी पालक रविंद्र देशमुख व विद्यार्थी उपस्थित होते. पुस्तकांचा गठ्ठा उघडल्यानंतर मुलांना नविन पुस्तक पाहण्याचा व वाचनाचा मोह आवरता आला नाही म्हणून पुस्तकांसोबत सर्वांनी फोटो काढून आनंद व्यक्त केला. सर्व विद्यार्थ्यांनी महिनाभरात सर्व पुस्तके वाचून नियमितपणे पुस्तक वाचनाचा संकल्प बोलून दाखवाला.

Protected Content