Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडकदेवळा येथे ग्रंथ प्रदर्शन व वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

पाचोरा-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती, भारतरत्न स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन व वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

ग्रंथ प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, धार्मिक पुस्तके, महिलांसाठी पाककृतींची पुस्तके, लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तके, युवा व युवतींसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेतीविषयक माहिती पुस्तके या ग्रंथ प्रदर्शनात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. सर्व प्रथम गावचे पोलीस पाटील एकनाथ कोळी, वाचनालयाचे संचालक विश्वास पाटील, संजय निकम, देवचंद गायकवाड, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील. उत्तम खरर्देकर, या मान्यवरांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील यांनी उपस्थितांना अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर उजाळा देतांना सांगितले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आपल्या भारतातील एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना आदरांजली म्हणून १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. कलाम यांनी सुरवातीला घरोघरी पेपर वाटून आपले शिक्षण पूर्ण केले. गरीबी व अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढून पायलट, शास्त्रज्ञ ते भारताचे राष्ट्रपती असा मैलाचा दगड पार करून भारतासाठी अनेक संशोधनात्मक कार्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांना “मिसाईल मॅन” ही उपाधी देखील मिळाली होती. विद्यार्थ्यांनी टी. व्ही. स्मार्टफोन, कॉम्प्युटर, यापासून काही काळ दूर राहून पुस्तकांच्या सहवासात राहून आपल्या ज्ञानात भर घालून वाचनाची आवड निर्माण करणे हाच “वाचन प्रेरणा दिवस” साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

माणूस परिस्थितीने गरीब असला तरी चालेल पण शिक्षणाने व ज्ञानाने श्रीमंत असायला हवा म्हणून आयुष्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, कारण ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान ठेव आहे. “युवक वाचतील तर, देश वाचेल” असे ते खात्रीने सांगत, आयुष्यात कितीही संकटे आली तरी आपण हार मानू नये त्यावर मात करून पुढे जात राहायचे. यश एक दिवस नक्की मिळते असे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम नेहमी म्हणत. असे मत डॉ. यशवंत यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाचे व फॉऊंडेंशन सर्व पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version