Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठराविक वर्गाकडून बॉलीवूडची बदनामी – मुख्यमंत्री

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

कोविड – १९ मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. 

राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे.

सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Exit mobile version