Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड नगरपंचायतीच्या मतदानास प्रारंभ

बोदवड प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला असून येथील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ जागांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. ओबीसी आरक्षणामुळे चार प्रभागांची निवडणूक नंतर होणार आहे. यामुळे येथे १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

या निवडणुकीत १३ प्रभागातून ५३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यासाठी शहरातील ८,००८ पुरूष आणि ७,४५८ महिला असे एकूण १५ हजार ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून येत आहे.

दरम्यान, मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १३ जागांसाठी प्रत्येकी दोन असे २६ मतदान केंद्र आहेत. तेथे २४४ कर्मचारी नेमले असून १९ महिला कर्मचार्‍यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. एका टीममध्ये ५ कर्मचारी असून त्यात एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे कर्मचारी आहेत. पोलिस निरीक्षक गजानन पडघम, एपीआय विनोदकुमार गोसावी व पीएसआय शरद माळी, महेश घायतड आणि अन्य कर्मचार्‍यांनी संरक्षणाची धुरा सांभाळली आहे.

Exit mobile version