Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी पोलिसांचे पथसंचलन

बोदवड प्रतिनिधी | तालुक्यातील भानखेडा गावात कोरोना रूग्णांनी वाद घातल्यानंतर गावात सामूहिक चाचण्या आणि लसीकरण करण्यात येत असून यासोबत पोलिसांनी सायंकाळी पथसंचलन केले.

बोदवड तालुक्यातील भानखेडा गावात कोरोनाचे अकरा रूग्ण आढळून आले असून प्रशासनाने उपाययोजना करण्यास प्रारंभ करताच काही रूग्ण व त्यांच्या आप्तांनी हुज्जत घातली. यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. या अनुषंगाने मंगळवारी आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासनाने उपाययोजना केल्या.

याच्या अंतर्गत ७३ नागरिकांची आरटीपीसीआर व १८ रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. त्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले. त्यामुळे गावातील कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली. त्यापैकी १२ रुग्ण गावातच गृहविलगीकरणात तर एक महिला रूग्णालयात उपचार घेत आहे. तसेच दोन दिवसांत गावातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, संध्याकाळी तहसीलदार प्रथमेश घोलप, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व दंगा नियंत्रण पथकाच्या कर्मचार्‍यांनी पथसंचलन केले. त्यांनी संपूर्ण गावात फेरी मारून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या व कोरोना प्रतिबंधक नियम पालनाच्या सूचना दिल्या. या सूचनांचे उल्लंघन केल्यास भादंवि १८६०चे कलम १८८ नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

Exit mobile version