Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. गिरीश महाजन व चंद्रकांत पाटलांमध्ये गुफ्तगू : चर्चा तर होणारच !

बोदवड, सुरेश कोळी | येथील नगरपंचायतीच्या दुसर्‍या टप्प्यातील निर्णायक क्षणांमध्ये आमदार गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची बोदवड येथे झालेली भेट चर्चेचा विषय बनली असून यामुळे परिसरात याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या दरम्यान माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुध्द चांगलेच रंगले होते. यात नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांची शहरात एकमेकांच्या समोर झालेली सभा प्रचंड गाजली होती. यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. यात आ. गिरीश महाजन यांनी बोलण्याच्या ओघात खडसे यांनी खूप प्रयत्न करून देखील आमचे चंद्रकांत पाटील हे जिंकल्याचे नमूद केले होते. यातील आमचे या शब्दावरून निवडणुकीच्या रणांगणात बर्‍याच काथ्याकुट करण्यात आला.

दरम्यान, उद्या म्हणजे १८ जानेवारी रोजी बोदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी निवडणूक होत असून याच्या प्रचारतोफा काल सायंकाळी थंडावल्या. आमदार महाजन, आमदार पाटील, एकनाथराव खडसे आणि रवींद्रभैय्या पाटील या मान्यवर नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार केला.

प्रचार संपल्यानंतर आ. गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंतराव कुलकर्णी यांच्या घरी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीबाबत गुफ्तगू केले. यातील तपशील समोर आला नसला तरी ऐन मतदानाच्या आधी या दोन्ही नेत्यांमधील झालेली भेट ही निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते असे जाणकारांचे मत आहे. तर या भेटीतून मुक्ताईनगर मतदारसंघातील एक अंडर करंटच्या स्वरूपात असलेली राजकीय मैत्री जगजाहीर झाल्याचेही मानले जात आहे.

Exit mobile version