Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्यांची कामे नियमानुसार करा, अन्यथा कारवाई ! : आ. पाटील

बोदवड प्रतिनिधी । कंत्राटदारांनी सध्या सुरू असलेली रस्त्याची कामे नियमानुसार करावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा आ. चंद्रकांत पाटील यांनी येथील आढावा बैठकीत दिला.

आ. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील रस्त्यांच्या कामांबाबत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी त्यांनी कामांत दिरंगाई करणार्‍या कंत्राटदारांकडून कामे काढून ती दुसर्‍या कंत्राटदारास देण्याचे आदेश त्यांनी दिले. सबकॉन्ट्रॅक्टर न नेमता संबंधित ठेकेदाराने स्वत: कामे करावी, त्यावर अभियंत्यांना लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान,तालुक्यातील विचवा ते बोदवड रस्त्यावरील खड्डे मुरूमच्या सहाय्याने बुजवले जात आहेत. ते डांबरमिश्रित खडीने बुजवण्यात यावे. या कामांचा आढावा दोन दिवसांत घेणार असून हलगर्जीपणा दिसल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला.

मलकापूर चौफुली ते पाटील पेट्रोल पंपापर्यंत ७०० मीटर रस्ता काँक्रीटीकरणासाठी नव्याने ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बंदिस्त गटारी व अमर हॉटेलपासून दीड किमी अंतरापर्यंत लॅम्प लावण्यात येणार आहेत. याचा जो ठेकेदार असेल त्याने स्वत: हे काम करावे, अशी सूचना आ.पाटील यांनी केली यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख, उप अभियंता प्रवीण बेंडकूळे, शाखा अभियंता किरण धनके उपस्थित होते.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन खोडके, संघटक शांताराम कोळी, अल्पसंख्याक संघटक कलीम शेख, शहरप्रमुख संजय माळी व हर्षल बडगुजर, विनोद पाडर, विभाग प्रमुख गोपाळ पाटील, नगरसेवक आनंदा पाटील व सुनील बोरसे, अमोल व्यवहारे, विनोद मोरे, ग्रा.पं.सदस्य दीपक माळी, गजानन पाटील, नईम खान, पवन माळी, मनोज पाटील, भूषण भोई, सचिन भोई, योगेश भोई, नीलेश माळी आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version