Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांधावरून दोन गट भिडले : परस्परविरोधी गुन्हे दाखल

maramari 1

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जलचक्र तांडा येथे बांधावर दगड लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यातील पहिली फिर्याद ही रमजान मुलतानी यांनी दिली आहे. यानुसार, जलचक्र तांडा येथे ३ जून रोजी रात्री पावणे ९ वाजता शेताच्या बांधावर संशयित रज्जाक मनवर मुलतानी हा फिर्यादीच्या शेतातील बोर्डाजवळ दगडगोटे लावत होता. यावेळी फिर्यादीने त्याला हटकले. यावेळी रज्जाकने त्याला मारहाण करून धरून ठेवले. तर युसूफ मुलतानी याने हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीचे डोक्यात मारहाण करून दुखापत केली. रज्जाक मुलतानी, ताज अली मुलतानी, युसूफ मुलतानी, मुस्तफा मुलतानी, अकबर मुलतानी, मुख्तार मुलतानी, रखाजा मुलतानी यांनी रमजान मुलतानी (वय २४) यास मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे बोदवड पोलिस स्टेशनमध्ये वरील संशयिताविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला.

यासोबत शेख रज्जाक मुलतानी (वय ५०) यांनी देखील फिर्याद दिली आहे. यानुसार शेताच्या बांधावर दगड लावण्याच्या कारणावरून संशयित पिरखॉं मुलतानी, समाजान मुलतानी, अयुब मुलतानी, फिरोज मुलतानी, आसिफ मुलतानी, मुसा मुलतानी, नूर मुलतानी (सर्व रा.जलचक्र तांडा) यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी व बिरखा मुलतानी याने काठीने फिर्यादीला मारहाण केली. या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन्ही परस्पर विरोधी फिर्यादीनंतर दोन्ही गटातील १४ जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय अंकुश जाधव हे करत आहेत.

Exit mobile version