Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काळी हळद विक्रीचे आमिष दाखवून लुटले; जादू-टोण्यामुळे झाली फसवणूक

मुक्ताईनगर प्रतिनिधी । आजच्या आधुनिक युगात जादू टोण्याच्या नावाखाली लुबाडणूक होण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. असाच एक प्रकार तालुक्यात घडला असून काळी हळद विक्रीच्या नावाखाली लुटणार्‍या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील घनदाट जंगलात कथित नागमणी असल्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून सुरू असून यातून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. तर काही वेळेत यातून हिंसक घटना देखील घडल्या आहेत. मात्र हा सर्व अंधविश्‍वासाचा प्रकार असल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे. तथापि, नागमणी व मांडूळ सापाची तस्करी हे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. एका गुन्हेगारी घटनेतून हेच पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

काळी हळद घेऊन कुलुपाला लावल्यास कुलूप उघडते अशी माहिती जाते अशी माहीती हलखेडा येथील काही जणांनी यू-ट्यूबवर टाकलेली आहे. हा व्हिडीओ बघून अतुल शंकर भालेराव (रा.खोपोली, रायगड) याने मनेल पांडुरंग चव्हाण (रा.हलखेडा,ता.मुक्ताईनगर) याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. भालेराव याने त्याचे मित्र किसन राजन्ना कस्तुलापुरी (रा.मुंबई, वाशी), निखिल गुलाबराव जाधव (रा.पुणे) व संतोष लोहार (रा.पुणे) यांना घेऊन काळी हळद घेण्याचे कबूल केले.

या अनुषंगाने मोबाईलवरून झालेल्या बोलण्यातून सौदा ठरला. किसन, निखिल, अतुल व संतोष लोहार हे चारचाकीने जळगाव जामोद नजीकच्या सुपोपळशी गावाजवळ आले. त्या ठिकाणी मनेल चव्हाण याच्यासह क्रिश पवार, रणजीत चव्हाण, रामचंद्र पवार, नाना आवीळ (सर्व रा.हलखेडा) यांनी त्या चौंघांना दुचाकीवर बसवून वढोदा येथील जंगलात नेले. वढोदा शिवारातील श्री मच्छिंद्रनाथ मंदिर परिसरातील जंगलात या चौघांना मारहाण करत मोबाईल, चांदीचे कडे व १ लाख ६७ हजार रूपये रोख तसेच चारचाकीची चावी हिसकावून घेतली.

यानंतर फसवणूक झालेल्यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. किसन कस्तुलापुरी यांच्या फिर्यादीवरून संशयित मनेल चव्हाण, क्रीश पवार, रणजीत चव्हाण, रामचंद्र पवार, नाना आवीळ (सर्व रा.हलखेडा), व अतुल भालेराव (रा. खोपोली) यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास भारसके तपास करत आहेत.

Exit mobile version