सहा जागांसाठी लढणार भाजपा -चंद्रकात पाटील

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच आधिकृत उमेदवार दिले आहेत.  आणि आज  माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेल्या उमेदवारीला भाजपने समर्थन दिले असून भाजपा आता ६ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे. यावरून राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेत देखील एका जागेवर अटीतटी होणार असल्याचे चित्र आहे.

भाजपतर्फे केंद्रीय संसदीय बोर्डाने राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या मार्गदर्शनानुसार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, राज्याचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची उमेदवारी निश्चित केली. तर आज उमा खापरे यांचा अर्ज दाखल करतेवेळीच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जास भाजपाने समर्थन दिले असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोन तर भाजपकडून पाच अधिकृत आणि एक अपक्ष असे सहा उमेदवार  आहेत. कॉंग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीकडून एकनाथराव खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर तर शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप, १५ दिवस आझाद मैदानातील आंदोलन, उपोषणात सहभाग नोंदवला होता. त्यामुळे शेतकरी अथवा अन्यायग्रस्त नागरिकांसाठी लढणाऱ्या सदाभाऊंना आमदार सद्सद्-विवेकबुद्धीने मतदान करतील. भाजपाचे पाच आणि अपक्ष पुरस्कृत सहावा असे उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Protected Content