Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप राबविणार अनाथ मुलांसाठी उपक्रम

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असतांना देशभरात यानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजीत न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून याबाबतचे पत्र जारी केले आहे. तर पक्ष अनाथ मुलांसाठी योजना राबविणार असल्याचे सूतोवाच देखील यात करण्यात आले आहे.

येत्या ३० मे रोजी केंद्रात सत्तारूढ असणार्‍या मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. खरं तर, यानिमित्त आधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मात्र कोविडची आपत्ती पाहता यंदा कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत असे निर्देश पक्षातर्फे देण्यात आले आहेत. या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या कठीण काळात जनतेचं दु:ख कमी करण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचं रक्षण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून तुमच्या आणि तुमच्या राज्यातील सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. या जागतिक महामारीनं आपल्या देशासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. या संकटांचा सामना सध्या आपला देश करत आहे, असे नड्डा यांनी नमूद केले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, कोरोनामुळे कित्येकांनी त्यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींना गमावलं. काही मुलांचे आई वडील कोरोनानं हिरावून नेले. अशा मुलांवर दु:खाचा किती मोठा डोंगर कोसळला आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. या मुलांच्या भविष्याची चिंता करणं आणि त्यासाठी ठोस पावलं उचलणं ही आपली जबाबदारी आहे. या मुलांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना सांभाळणं हे आपलं सामाजिक कर्तव्यदेखील आहे. अशा मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी असलेल्या योजनांची माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल अशी माहिती देखील नड्डा यांनी या पत्रात दिली आहे.

Exit mobile version