धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल यांना भाजपची उमेदवारी

धुळे प्रतिनिधी | धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेंमधून निवडून देणार्‍या विधानपरिषद सदस्यासाठी भाजपने माजी मंत्री अमरीश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा पाचही जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये मुंबई -राजहंस सिंह; कोल्हापूर : अमल महाडिक; धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल; नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल असे उमेदवार देण्यात आले आहेत.

यात खान्देशातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या धुळे-नंदुरबारमधून माजी मंत्री अमरीश पटेल यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विरूध्द शिवसेनेतर्फे चंद्रकांत रघुवंशी तर कॉंग्रेसच्या वतीने अमळनेरचे माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांना उमेदवारी मिळू शकते. असे झाल्यास येथे तिरंगी सामना रंगू शकतो.

अमरीश पटेल हे मातब्बर राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९९० ते २००९ या दरम्यान चार पंचवार्षिकमध्ये कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत प्रतिनिधीत्व केले. यानंतर ते लागोपोठ दोनदा विधानपरिषदेवर निवडून गेले. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी शालेय शिक्षण, क्रीडा आदी मंत्रीपदेही भूषविली आहेत. आता ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Protected Content