Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीतला बेबनाव भाजपच्या पथ्यावर

जळगाव प्रतिनिधी । रावेरमध्ये भाजपने प्रचाराची मोर्चेबांधणी केली असतांना विरोधकांकडून या जागेबाबत रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यातच काँग्रेस व राष्ट्रवादीत या मतदारसंघावरून बेबनाव सुरू झाला असून या बाबी भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचे चिन्हे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव मतदारसंघासाठी गुलाबराव देवकर यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले असून त्यांचा प्रचारदेखील सुरू झाला आहे. तर रावेर मतदारसंघात रक्षाताई खडसे यांचे तिकिट निश्‍चित मानले जात असून त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर भाजपचा जळगावातील आणि विरोधकांचा रावेरातील उमेदवार अद्याप निश्‍चित झालेला नाही. यात रावेर लोकसभा मतदारसंघात अगदी ही जागा कुणाला सुटणार यावरून वाद आहेत. गत निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढविली असली तरी या पक्षाला यश लाभले नव्हते. यामुळे काँग्रेसने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपणच ही जागा लढविणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.

गत काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेत रावेरची जागा आपलाला मिळावी अशी मागणी रेटून धरली आहे. एवढेच नव्हे तर ही जागा न मिळाल्यास आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याची टोकाची भूमिकादेखील जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक पाहता आकड्यांचा विचार केला असता, रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद ही काँग्रेसच्या तुलनेत अधिक आहे. गत विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना एकाही विधानसभेत यश लाभले नाही. मात्र काँग्रेसचे उमेदवार हे फक्त रावेर-यावल व मलकापूर मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकावर होते. तर राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र भुसावळ, जामनेर, चोपडा या मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकावर होते. यामुळे साहजीकच राष्ट्रवादीने रावेरवर दावा सांगितला आहे. मात्र या पक्षाने उमेदवारीबाबत आपले पत्ते अद्याप खुले केले नाहीत.

माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी आणि रवींद्रभैय्या पाटील हे राष्ट्रवादीतर्फे दावेदार मानले जात आहेत. यात जिल्ह्यातील नेत्यांनी अरूणभाई गुजराथी यांच्या नावाची पसंती श्रेष्ठींना कळविली आहे. तर अलीकडेच एका मातब्बर महिला उमेदवाराचे नावदेखील समोर आले आहे. मात्र गत लोकसभा निवडणुकीत अचानक मनीष जैन यांचे नाव ज्या पध्दतीत समोर आले होते. त्याच पध्दतीत राष्ट्रवादीतर्फे धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो. तथापि, सक्षम उमेदवार मिळाला तरी काँग्रेसची साथ नसेल तर राष्ट्रवादीचा उमेदवार तगडे आव्हान उभे करू शकेल का ? या बाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

Exit mobile version