Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील मेगा पोलीस भरतीला भाजप नेत्यांचा विरोध

मुंबई । मराठा आरक्षणाला स्थगिती असतांना मेगा पोलीस भरती काढल्याबद्दल नापसंती व्यक्त करत भाजप नेत्यांनी या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात सर्वात मोठी पोलीस भरती करणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारनं बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केला. परंतु या निर्णयाला मराठा समाजाच्या नेत्यांकडून विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, राज्यात इतिहासातली सर्वात मोठी पोलीस मेगा भरती मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर का? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती कशाला? आगीत तेल टाकत आहात, जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

तर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही याला विरोध केला आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय योग्य नाही, आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज व्यथित आहे. त्यात सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. ही भरती करणे म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देणारं आहे. आणखी काही काळ थांबावं, जे काही लक्ष केंद्रीत करायचं असेल ते आरक्षण कसं लागू करु शकता याचा विचार करावा. थोड्या दिवसाने भरती करण्यास अडचण काय? पोलिसांवर तणाव आल्यामुळे पोलीस भरती करताय असं म्हणता, पण मास्क घालून पोलीस भरती घेणार कशी? असा सवाल संभाजीराजेंनी राज्य सरकारला विचारला आहे. तरी सरकारने भरती केली तरी मराठा समाजात आक्रोश निर्माण होईल. सगळ्यांना सुखानं राहायचं असेल तर वातावरण गढूळ करु नका, मराठा समाजातल्या मुलांनी काय करायचं? नोकर भरतीला विरोध नाही पण टाईमिंग चुकीचं आहे. अध्यादेश काढा पण आरक्षण द्या असा इशारा संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, मेगा पोलीस भरतीला होणारा विरोध पाहून याला तात्पुरती स्थगिती मिळण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version