खडसेंच्या खप्पामर्जीचा दणका: जळगावात कोअर समितीची बैठक

khadse e1550572684596

जळगाव प्रतिनिधी । पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी जाहीरपणे आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर याची पक्षाने गंभीर दखल घेतली असून जळगावात कोअर समितीची बैठक आयोजीत करण्यात आली असून यात विधानसभा निवडणुकीबाबत मंथन करण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, गत विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा अतिशय धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या पराभवात भाजपमधीलच एका गटाचा हातभार असल्याचे दिसून आले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या १२ डिसेंबर रोजी भगवान गडावरील कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झालेली असतांना आज एकनाथराव खडसे यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली. यानंतर खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला. यात ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांच्या पराभवासाठी पक्षातील काही मंडळी जबाबदार असून त्यांची नावे आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कळविली आहेत. आता त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी आपली अपेक्षा असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. पक्ष नेतृत्वावरच आपला रोष असल्याचे ते म्हणाले. भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला डावलले जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी जाहीरपणे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची कुचंबणा होत असल्याचा आरोप केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्याचे दिसून आल्याने याची पक्षाने दखल घेतली आहे. आता माजी मंत्री तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगावात पक्षाच्या कोअर समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बालाणी लॉन येथे आयोजित या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालांची समीक्षा करण्यात येईल असे मानले जात आहे.

Protected Content