Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे महर्षी व्यास मंदिरात भाजपातर्फे घंटानाद

यावल (प्रतिनिधी)। राज्यातील मंदिरे सुरू करा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी मंदीरात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील महर्षी व्यास मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने राज्यात ओढवलेल्या जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत, बाजारपेठा उघड्या केल्यात, बाजारात प्रचंड गर्दी, मात्र भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक लक्षात घेत नाहीत. केंद्र सरकारने ४ जून २०२० रोजी या संदर्भातील नियमावलीसह परिपत्रकही जारी केले तरी अजून राज्यातील देवस्थाने बंदच ठेवली आहेत.

मंदिरे सुरू करा, या मागणी करीता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना, धर्मचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. आज २९ ऑगस्ट २०२० रोजी स. ११.३० वाजता महर्षी व्यास मंदिर यावल येथे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे यावल शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, बबलू घारू, अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस जळगाव जिल्हा रामकृष्ण खेडकर, व्यंकटेश बारी, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस यावल, योगेश चौधरी, यावल शहर उपाध्यक्ष रितेश बारी, युवा मोर्चा शहराध्यक्ष कैलास फेगडे आदी पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कोरोना संसर्गाचे नियम पाळत तोंडाला मास्क, रुमाल बांधुन या घंटानाद आंदोलनात सहभागी झाले.

Exit mobile version