Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा आणि शिवसेनेने एकत्र यायला हवे – मनोहर जोशी

manoher jashi

मुंबई, वृत्तसंस्था | भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे हेच चांगले आहे, असे मला वाटते. मात्र सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचे दिसते आहे, असे खळबळजनक विधान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आज (दि.१०) येथे केले आहे.

 

ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यानंतर निकाल लागला तो महायुतीच्या बाजूने मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवत मुख्यमंत्रीपद मिळवले.

काय म्हणाले, मनोहर जोशी?
“माझ्या मते भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र राहयला हवे. मात्र सद्यस्थितीत हे दोन्ही पक्षांना हे मान्य असावे, असे वाटत नाही” मनोहर जोशी यांनी केलेले हे वक्तव्य अर्थातच खळबळजनक आहे. कारण निवडणूक होण्यापूर्वी हे भाजपा आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र लढले होते. निवडणूक निकाल लागला तो कौलही महायुतीलाच मिळाला होता. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालेच पाहिजे असा दावा केला होता. मात्र यावरुन या दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला.

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवत महाराष्ट्रात शिवसेनेने सत्ता स्थापन केली. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा आहे. अवघ्या १३ दिवसातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र यायला हवे, असे वक्तव्य केले आहे.

Exit mobile version