Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरमध्येही भाजपला धक्का; महापालिकेतील सत्ता महाविकास आघाडीकडे !

अहमदनगर । सांगली आणि जळगाव महापालिकांच्या पाठोपाठ नगर येथील महापालिकेतही महाविकास आघाडीने भाजपला धक्का देत सत्ता संपादन केली आहे. यामुळे भाजपने तिसरी महापालीका गमावली आहे.

अहमदनगर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची महापौर तर राष्ट्रवादीच्या गणेश भोसले  यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी अर्ज दाखल करताना नगरचे राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप तर राष्ट्रवादी आणि सेनेचे नगरसेवक यांची उपस्थिती होती. 

शिवसेनेच्या वतीने नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. शेंडगे यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते.  आज राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमहापौरपदी गणेश भोसले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. मात्र विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं निवडणूक बिनविरोध पार पडली.

गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.

Exit mobile version