Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडी धरणाला पाणी सोडलं जाणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत उत्तर महाराष्ट्रच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. यात जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधुन सोडण्यात येणार आहे. यामुळे आता हे प्रकरणाची पुढील दिशा काय होणार हे महत्वाचं ठरणार आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कारखाना, संजीवनी कारखाना आणि शंकरराव काळे कारखाना या तिघांनी न्यायालयात याचिका दाखल करत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. काळे , कोल्हे आणि विखे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी आज पार पडली. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणीनंतर वकिलांनी प्रतिक्रिया दिली. “राज्य सरकारने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावर अहमदनगरमधून विरोध करण्यात आला. या प्रकरणाचा वाद कोर्टापर्यंत गेला. सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कोर्टात करण्यात आली. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिलाय. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 डिसेंबरला होईल, असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे”, अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली.

नाशिकच्या पेठ आणि सुरगणा भागात तसा चांगला पाऊस पडतो. या पाण्याचा योग्य वापर व्हायलादेखील हवा. दमणगंगा, नारपार नद्यांच्या खोऱ्यांमधून गुजरातला पाणी घेऊन जाण्याचा केंद्र सरकारचा मेगा प्लॅनदेखील आहे. पण या नारपार योजनेला देखील स्थानिकांचा विरोध आहे. आगामी काळात ऊन जसं वाढत जाईल, तसा हा पाणी प्रश्न जास्त तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला सामंजस्याने हा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे.

Exit mobile version